पुणे : जिल्ह्यातील तात्पुरते व कायमस्वरुपी क्रशर व खाणपट्टाधारकांनी सर्वप्रकारच्या परवानगी घेवूनच उत्खनन करावे, परवानगीकरीता लागणाऱ्या सर्व संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेवून परवानगीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात येथे क्रशर व खाणपट्टाधारकांच्या अडअडचणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुयोग जगताप, जिल्हा क्रशर खाणपट्टाधारक संघटनेचे अध्यक्ष प्रदिप कंद यांच्यासह जिल्ह्यातील क्रशर खाणपट्टाधारक उपस्थित होते.
क्रशर आणि खाणपट्टाधारकांच्या समस्या जाणून घेवून श्री. डुडी म्हणाले, क्रशर आणि खाणपट्टा परवानगीकरीता लागणाऱ्या पर्यावरण ना-हरकत प्रमाणापत्राकरीता क्रशर आणि खाणपट्टाधारकांना परवानगी देण्याबाबत पर्यावरण विभागाच्या सचिवांना विनंती करण्यात येईल. क्रशर खाणपट्टाधारकांनी आपल्या वाहनांवर जीपीएस लावून इलेक्ट्रानिक ट्रन्झिंट पासेस (ईटीपी) ठेवावे. आपआपल्या खाणपट्ट्याची भूमी अभिलेख विभागाद्वारे मोजणी करुन घ्यावी. खाणपट्टयात केलेले उत्खनन आणि त्याकरीता भरलेल्या शुल्काचा ताळमेळ संबंधित तहसीलदाराकंडून तपासून करून घ्यावा.
जिल्ह्यात पारदर्शक पद्धतीने कामकाज करण्यावर प्रशासनाचा भर आहे, त्यामुळे प्रशासनाच्यावतीने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. आपल्या परिसरात बेकायदेशीर कामकाज होत असल्यास प्रशासनास कळवावे, याबाबत तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. डूडी म्हणाले.
श्री. मापारी म्हणाले, तात्पुरते खाणपट्टाधारकांनी नियमाप्रमाणे ६ मीटर पेक्षाअधिक खोल खोदकाम करु नये, आवश्यक असलेल्या सर्वप्रकारच्या परवानग्या उपलब्ध करुन देण्याकरीता प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. मापारी म्हणाले.
श्री. जगताप यांनी जिल्ह्यातील खाणपट्टयाबाबत माहिती दिली.
श्री. कंद यांनी क्रशर, खाणपट्टाधारकांच्या अडीअडचणींबाबत सूचना केल्या. प्रशासनाच्यावतीने घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले.