बारामती - बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात ग्रंथदिंडी काढत घोषणेतून मराठी भाषेचे व वाचनाचे महत्त्व सांगत अतिशय प्रसन्न वातावरणात मराठी भाषा गौरव दिनाची सुरुवात झाली. मराठी भाषा गौरव दिवस कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. वर्षा सिधये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात सुंदर अशा मराठीच्या बोली भाषांची ओळख नाटक रुपात करून झाली.
तद्नंतर प्रमुख पाहुण्या डॉ. वर्षा सिधये व मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या बडबडगीते व संत साहित्य या हस्तलिखितांचे प्रकाशन केले. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विविध इयत्तेतील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा इतिहास व संस्कृती तसेच मराठी सणवार नृत्यातून सादर करत, गायन व नाटिका इ. च्या माध्यमातून अतिशय सुंदर व आकर्षक पद्धतीने सादर केले. शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके व विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अंती विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रमुख पाहुण्यांनी वाचनाचे महत्त्व सांगत अभिजात मराठी भाषेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९वी च्या विद्यार्थीनी कु. स्वानंदी शितुत आणि कु. रिद्धी साळुंखे यांनी केले.
वरील प्रसंगी शाला समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित, महामात्र मा.डॉ. गोविंद कुलकर्णी सर मएसो नियामक मंडळाचे सदस्य मा.श्री.राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य.कुलकर्णी सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.