Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून बारामतीत गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रिया उपक्रम ....बारामतीत सुरू झाला रुग्णसेवेचा नवीन आयाम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून बारामतीत गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रिया उपक्रम
 बारामतीत सुरू झाला रुग्णसेवेचा नवीन आयाम

बारामती : आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या बालकांसाठी एक दिलासादायक उपक्रम बारामतीत सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने गरजू मुलांसाठी विनामूल्य शस्त्रक्रिया उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

बारामतीतील मुथा हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा आणि डॉ. सौरभ मुथा यांच्या सहकार्याने मुंबईतील प्रख्यात शल्यविशारद डॉ. संजय ओक आणि त्यांचे सहकारी हे बालकांवर सेवाभावी वृत्तीने मोफत शस्त्रक्रिया करत आहेत.

शनिवार व रविवार या दोन दिवसांत ३० बालकांवर विविध शस्त्रक्रिया केल्या जाणार असून, त्यात हर्निया, टाळूला चिटकलेली जीभ दुरुस्त करणे, तसेच शरीरावरील गाठी काढणे यासारख्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तसेच डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा, अनिल नवरंगे, अनिल जोगळेकर, माजी नगराध्यक्षा भारती मुथा, प्रियांका मुथा, डॉ. अनिल मोकाशी, अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी नितीन हाटे, किरण तावरे आणि प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांची उपस्थिती होती.

 मोफत शस्त्रक्रियांचा उपक्रम नियमित राबवणार!

"उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रेरणेतून बारामतीत हा उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प केला आहे. यामुळे गरजू बालकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल," असे डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

 उपचारांची नवी पहाट!

या अभिनव उपक्रमामुळे बारामतीतील गरजू कुटुंबांसाठी आरोग्यसेवेचे नवे दार खुले झाले आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या मुलांसाठी हा उपक्रम एक मोठी संधी ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test