उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजेत्या खेळाडू व संघाला बक्षीसाचे वितरण
बारामती : नगर विकास विभाग व आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने आयोजित 'पुणे जिल्हास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा २०२४-२५' चे बक्षीस वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ११ जानेवारी रोजी कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे करण्यात आले. यावेळी त्यांनी विजयी संघ, खेळाडूचे अभिनंदन करत सर्वांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी 'एमआयडीसी'चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपायुक्त दत्तात्रय लांघी, जिल्हा प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास, जिल्ह्यातील नगर परिषदेचे मुख्यधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी नगर परिषद प्रशासन शाखेतील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
या निमित्ताने जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे प्रथम आयोजन करण्याचा बहुमान बारामती नगर परिषदेस मिळाला. या स्पर्धेत क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल, रस्सीखेच, स्वीमिंग, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धीबळ आदी क्रिडा प्रकार व सांस्कृ्तिक कार्यक्रम यांचा समावेश होता.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील १७ नगरपालिका, जिल्हा व विभागीय आयुक्त कार्यालय असे एकूण १८ संघ सहभागी झाले. विविध खेळात एकूण १ हजार ७९ अधिकारी व कर्मचारी; त्यामध्ये ७९२ पुरुष व २८७ महिला खेळाडूंचा समावेश होता.
सर्व स्पर्धा ९ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, जिल्हा क्रिडा संकुल, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, मिशन हायस्कूल तसेच कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, अशी माहिती बारामती नगर परिषदेचे मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.