बारामती : 'रस्ता सुरक्षा अभियान २०२५' अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक शाखा, बारामती विद्यार्थी वाहतूक संघटना, झेनिथ इन्सुरन्स कंपनी आणि पवन मोटार ड्रायव्हिंग स्कुल काटेवाडी यांच्या संयुक्तविद्यामाने रस्ते सुरक्षाविषयक नियमांच्या जनजागृतीकरीता शालेय बस रॅली आयोजित करण्यात आली. यावेळी रस्ता सुरक्षितेतच्यादृष्टीने नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.
यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती विद्यार्थी वाहतूक संघटनेचे संस्थापक तानाजी बांदल, अध्यक्ष गजनान गावडे, उपाध्यक्ष गणेश सावंत आदी उपस्थित होते.
श्री. निकम म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना रहदारीच्या रस्त्यावर विद्यार्थ्यांची बसमध्ये चढउतार करु नये. शालेय बसमध्ये आसनक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करु नये. शालेय वाहनाची कागदपत्रे वैध कालावधीतील असावीत व ती वाहन मालक व चालकांनी सोबत बाळगावी. दुचाकीस्वारानी हेल्मेट तसेच चारचाकी वाहन चालवितांना वाहनचालक तसेच मागील प्रवाशांनी सीटबेल्टचा वापर करावा, असे आवाहन श्री. निकम यांनी केले.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली व ती पुढे पेन्सिल चौक, भिगवण चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कसबा मार्गे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे समारोप करण्यात आला, अशी माहिती श्री. निकम यांनी दिली आहे.