सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयामध्ये कै. मुगुटराव साहेबराव काकडे - देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे सदस्य,व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य घोरपडे यांनी वक्तृत्व ही एक कला आहे, त्यामध्ये नवरसाचा योग्य वापर केला तर वक्तृत्व बहरते, तसेच आजच्या तरुण पिढीमध्ये वाचनाचे महत्त्व कमी झाले आहे, वाचनाने वक्तृत्व समृद्ध होते, व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, तसेच बौद्धिक क्षमता विकसित होतात. असे विचार त्यांनी मांडले त्याचबरोबर ही स्पर्धा खूप जुनी व नावाजलेले आहे या स्पर्धेतून नामांकित वक्ते निर्माण झालेले आहेत. तसेच या स्पर्धेचे विषय दर्जेदार व चालू घडामोडीशी निगडित असल्याने विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वामध्ये त्यांच्या भौतिक क्षमताचा कस लागतो, तसेच या स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक राज्यातील विविध भागातून आल्यामुळे, भविष्यामध्ये त्या त्या विभागाचे व्यासपीठ गाजवतील यात मला शंका वाटत नाही असे विचार मांडले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वायदंडे यांनी आपल्या मनोगतामध्ये आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुगुटराव आप्पा हे नावाजलेले वक्ते होते आणि म्हणूनच त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही वक्तृत्व स्पर्धा सुरू केली आहे. सहकारातील महामेरू म्हणजेच मुगुटराव आप्पा आहेत, असे आपल्या मनोगत मध्ये सांगून उपस्थितांचे स्वागत केले.
या स्पर्धेमध्ये एकूण २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये महात्मा फुले महाविद्यालय, रायगडचा विद्यार्थी यश पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले परीक्षक म्हणून प्रा. डॉ. किरण गाढवे, व प्रा. डॉ. विजय बालघरे यांनी जबाबदारी पार पाडली, याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धक विद्यार्थी आदी उपस्थित होते. प्रा.जे.एन.खोमणे यांनी प्रास्तविक केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रा.अच्युत शिंदे यांनी मानले.
स्पर्धेमधील विजेते पुढीलप्रमाणे अनुक्रमे, प्रथम यश रवींद्र पाटील महात्मा फुले महाविद्यालय रायगड, द्वितीय संस्कृती संजय जगताप नवमहाराष्ट्र विद्यालय पण्दरे, तृतीय रोहन ज्योतीराम कवडे संस्कार मंदिर महाविद्यालय, वारजे माळवाडी पुणे, उत्तेजनार्थ तेजस दिनकर पाटील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग.