Sports news मु.सा काकडे महाविद्यालयाला ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद.
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु.सा काकडे महाविद्यालयात मंगळवार दि २६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा अंतर महाविद्यालयीन मुलांच्या ग्रीकोरोमन व फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत १४५ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य ऋषिकेश धुमाळ यांच्या शुभहस्ते झाले. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत पुणे जिल्हासाठी जास्तीत जास्त पदके जिंकावीत व राष्ट्रीय स्तरावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पदके मिळवून देऊन विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा.विद्यापीठ स्तरावरील शारीरिक शिक्षण संचालकांच्या अडचणी प्रामुख्याने सोडवू असे सांगितले. खेळाडू विद्यार्थ्यांनी आशियाई व ऑलम्पिक स्पर्धेत पदके मिळवून महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर उज्वल करावे असे सांगितले.
पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. उमेशराज पनेरू यांनी ३ व ४ डिसेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी खेळाडू विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये ग्रीको रोमन कुस्ती क्रीडा प्रकारातील सांघिक विजेतेपद मु.सा काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर व राजमाता जिजाऊ महाविद्यालय भोसरी यांना समान गुणांच्या आधारावर संयुक्त सांघिक विजेतेपद देण्यात आले. टी.सी कॉलेज बारामती यांना ग्रीको रोमन कुस्ती प्रकारामध्ये उपविजेतेपद प्राप्त झाले. फ्रीस्टाइल कुस्तीचे विजेतेपद अमृतेश्वर महाविद्यालय विंझर यांना प्राप्त झाले व उपविजेतेपद विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब यांना मिळाले. विजेत्या खेळाडूंचे पदक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे देशमुख व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे देशमुख,संस्थेचे सचिव सतीश लकडे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भरत भुजबळ, सहसचिव डॉ.प्रीतम ओव्हाळ, ज्येष्ठ शारीरिक शिक्षण संचालक डॉ.शैलेश कांबळे, डॉ.दिनेश सरोदे,डॉ. गौतम जाधव,डॉ.सुहास बैरट, डॉ अनिल मोरे, डॉ.विद्या पठारे, डॉ सविता फाळके यांच्या उपस्थितीत विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. रवींद्र बोत्रे व आंतरराष्ट्रीय पंच रोहिदास आमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.बाळासाहेब मरगजे यांनी केले. प्रा.दत्तराज जगताप यांनी आभार मानले.