बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघाकरीता २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे तहसील कार्यालय प्रशासकीय भवन बारामती येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी निवडणूक निरीक्षक नझीम खान, निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्रे, नायब तहसीलदार पूनम दंडिले उपस्थित होते.
श्री. खान म्हणाले, सूक्ष्म निरीक्षकांना मतमोजणीची प्रक्रिया काळजीपूर्वक समजून घ्यावी, प्रक्रियेदरम्यान काही अडचण आल्यास ताबडतोब वरिष्ठांचे तात्काळ मार्गदर्शन घ्यावे.
श्री. नावडकर यांनी मतमोजणी प्रक्रियेबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी घेण्यात येणारी गोपनीयतेची शपथ, मतमोजणी बैठक व्यवस्था, कर्मचारी संख्या, ईव्हीएम मतमोजणी, 17 सी फॉर्म, टपाली मतदान मोजणी प्रक्रिया आदीबाबत विस्तृतपणे माहिती दिली. मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी आहे, त्यामुळे सोबत मोबाईल घेवून जावू नये, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आज झालेल्या प्रशिक्षणास एकूण ४४ सूक्ष्म निरीक्षक उपस्थित होते.