उद्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा उमेदवारी अर्ज होणार दाखल; बारामतीत भव्य रॅली, कन्हेरीत होणार प्रचाराचा शुभारंभ
बारामती, दि. २७ ऑक्टोबर - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा उमेदवारी अर्ज उद्या सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी दाखल केला जाणार आहे. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता बारामती शहरातील कसबा येथून भव्य रॅली काढली जाणार असून दुपारी २ वाजता कन्हेरी येथे प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे निवडणूक लढवत आहेत. उद्या सोमवारी दि. २८ ऑक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या सकाळी ९ वाजता अजितदादा बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतील. त्यानंतर कसबा येथील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.
कसबा येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. ही रॅली गुणवडी चौक, महावीर पथ, गांधी चौक, सुभाष चौक, भिगवण चौक मार्गे इंदापूर चौकात येईल. या ठिकाणी रॅलीची सांगता होणार आहे. त्यानंतर बारामती प्रशासकीय भवनात पाच महिलांच्या उपस्थितीत अजितदादांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून कन्हेरी येथे प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे.
बारामतीत होत असलेल्या रॅलीसाठी तसेच कन्हेरी येथे प्रचार शुभारंभासाठी बारामती शहर आणि तालुक्यातील सर्व मतदार, सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, महिला, युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.