बारामतीतील निंबुत येथील श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत सचिवासह लेखनिकाने १ कोटी २२ लाख २९हजार ८०५ रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. लेखा परीक्षक किरण मोरे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये संस्थेचे सचिव सतीश वसंतराव काकडे (रा:नीरा ), संस्था लेखनिक निलेश नरहरी कुलकर्णी (रा :नीरा ) या दोघांवर ४२० सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गैरव्यवहारामुळे नींबूतसह निरा परिसरात खळबळ उडाली आहे.
संस्था लेखनिक व सचिव या दोघांनी पदाचा दुरुपयोग करून सदर संस्थेमध्ये सभासदांनी जमा केलेली १ कोटी २२लाख २९हजार८०५ रुपये रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरव्यवहार करून अपहार केला आहे. सभासदांनी जमा केलेली ही रक्कम दोन्ही आरोपींनी संस्थेच्या बँक ऑफ महाराष्ट्र तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नीरा येथे न भरता दप्तरी दिशाभूल करणारे खोटे व बनावट व्यवहार तसेच नोंदी जाणीवपूर्वक करून खोटे जमाखर्च नोंदवून संस्था व नमूद संस्था सभासद यांची फसवणूक व विश्वासघात करून संस्थेचे रकमेचा गैरव्यवहार केला आहे. या गैर व्यवहारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सभासदांना दसरा व दिवाळीच्या तोंडावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. या घटनेचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर आर एम साबळे करीत आहेत.