विधानसभा निवडणूक.. आचारसंहितेच्या कालावधीत संशयीत वाहतूकीवर कडक नजर...
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा सीमा आढावा बैठक -जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे : पुणे जिल्ह्यासह सीमेवरील अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, सातारा व रायगड या जिल्ह्यांनी आपापल्या चेक पोस्टवर आचारसंहितेच्या कालावधीत संशयीत वाहतुकीवर कडक नजर ठेवून कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केल्या.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, सातारा व रायगड या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांची दूरदृश्य प्रणाली द्वारे आंतरजिल्हा सीमा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. दिवसे बोलत होते.
पुणे जिल्ह्याच्या संदर्भात डॉ. दिवसे म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाके (चेक पोस्ट) लावण्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा ते लावण्यात यावेत. तसेच आवश्यकतेनुसार चेक पोस्टची जागा बदलण्यात यावी. चेक पोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे, छायाचित्रीकरण अनिवार्य करावे. येणारी वाहने ज्या जिल्ह्यात प्रवेश करतील त्या जिल्ह्यातील चेक पोस्टवर तपासणी करून संबंधित चेक पोस्ट ने अंतिम कारवाई करणे अपेक्षित आहे.
पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट, भोर परिसरातील पश्चिम भागात छुप्या रस्त्याने अंमली पदार्थ, गावठी दारूची वाहतूक होऊ नये यासाठी वारंवार तपासणी करण्यात यावी. तसेच जल, वायू या मार्गानेदेखील वाहतूक होऊ नये यासाठी तपासणीच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पुणे जिल्ह्यात 204 मावळ, 199 दौंड, 200 इंदापूर, 201 बारामती, 195 जुन्नर व 198 शिरूर या विधानसभा मतदारसंघाची हद्द शेजारील रायगड, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा व ठाणे या जिल्ह्याशी जोडलेली आहे.