सातारा - नागरिकांना गतीमान प्रशासन लाभण्यासाठी राज्यात जिल्हा मुख्यालय, महानगरपालिका क्षेत्र, विस्ताराने मोठ्या तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयाच्या संख्येत वाढ करत अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या निर्णयाचे स्वागत करुन खंडाळा तालुक्यातील वाढते नागरीकीकरण, लोकसंख्या, तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या तहसील कार्यालयातील वाढलेली कामकाजाची व्याप्ती पाहता लोणंद शहरात अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती होणे अत्यंत गरजेचे आहे या अप्पर तहसील कार्यालयाची निर्मितीमुळे लोणंद शहर व पंचक्रोशीतील अनेक गावे वाड्या वस्त्यांतील नागरिकांना जलद गतीने महसूल संदर्भातील सुलभ सेवा मिळेल व वेळ, पैसा, प्रवास याची बचत होऊन अनेक गैरसोय दुर होतील. याबाबत शासन दरबारी निर्णय होऊन लोणंद शहरात अप्पर तहसील कार्यालय मंजूर करावे व त्याची उभारणी करण्यात येऊन तमाम जनतेला दिलासा द्यावा अशा मागणीचे विनंती निवेदन साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांकडे मेलद्वारे तसेच सातारा अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे व मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे (cmo) अधिकारी विश्वास घुगे यांकडे समक्ष भेटून दिले.
सातारा जिल्हयामधील खंडाळा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरणा बरोबरच लोकसंख्या व नागरी वसाहतींचा विस्तार वाढताना दिसत आहे. खंडाळा तालुक्यात सुमारे 66 गावे + वाड्या वस्त्या आहेत तसेच तालुक्यातील सर्वात मोठी व्यापारी पेठ, कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकीक प्राप्त असलेले , श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यातील पहिले मुक्कामाचे ठिकाण असलेले लोणंद हे नगरपंचायत असलेले शहर आहे. पंचक्रोशीतील अनेक गावे वाड्या वस्त्यांतील नागरिक लोणंद शहरावर अवलंबित आहेत.
भारतीय रेल्वे चे मोठे जंक्शन म्हणून लोणंद जंक्शन उदयास येत आहे तसेच औद्योगिक कारखाने, मोठ्या बाजारपेठा, व्यापारी पेठा, बसस्थानक, वैद्यकीय दवाखाने, शाळा, महाविद्यालये, आय टी आय, पोलीस स्टेशन, विज वितरण कार्यालय, कृषि उत्पन्न बाजार समिती, नॅशनल बँका आदी महत्त्वाच्या बाबींसाठी खंडाळा तालुक्यातील अनेक गावे वाड्या वस्त्यांवरिल अबालवृद्ध नागरिकांची लोणंद शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. भारतीय जनगणना 2011 नुसार खंडाळा तालुक्याची लोकसंख्या 137418 होती यामध्ये झपाटय़ाने मोठी वाढ झाली आहे. मौजे - खंडाळा हे तालुक्याचे ठिकाण आहे, येथे सर्वच प्रशासकीय कार्यालये आहेत. लोणंद व पंचक्रोशीतील अनेक गावे व वाड्या वस्त्यांवरिल नागरिकांना विविध महसूली कामकाज संदर्भात खंडाळा येथे जावे लागते, लोणंद ते खंडाळा यामधे सुमारे 20 किलोमीटर चे अंतर असल्याने वेळ, पैसा, प्रवास आदी अनेक संकटातून ये जा करावी लागते हेलपाटे मारावी लागतात यासाठी लोणंद येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती होणे अत्यंत गरजेचे असल्याने सदर मागण्यांसाठी साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी निवेदन दिले .