बारामती ! हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये किल्ला बांधणी स्पर्धा उत्साहात
बारामती - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल बारामती. येथे शनिवार, दि.२६/१०/२०२४ रोजी हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये किल्ला बांधणी स्पर्धा उत्साहात पार पडली.
दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी निमित्ताने शाळेत किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक व माध्यमिक विभागाचा यामध्ये सहभाग होता. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक अशा किल्ल्यांची बांधणी केली. आपली संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वारसा इ. अभ्यास व जपणूक व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य हेतू.
शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हरहर महादेव या घोषणांनी अवघा परिसर दुमदुमला आणि बालचमूंचा उत्साह द्विगुणित झाला. किल्ला बांधण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य, किल्ल्यांवरील महत्त्वाची ठिकाणे, माहिती पत्रिका, Google maps यांची जुळवाजुळव सर्व विद्यार्थ्यांनी इंटरनेटच्या मदतीने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने केली.
सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले ऍड.श्री.योगेश वाघ सर ( बारामती ट्रेकर्स क्लबचे संस्थापक सदस्य, इतिहास अभ्यासक) यांनी किल्ल्यांची पाहणी केली आणि निकाल जाहीर केला.
तसेच दिवाळी निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटपही करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक व विद्यार्थी यांनी सायंकाळी ०६:०० वा. शाळेत येऊन रांगोळ्या काढून, शाळेची सजावट करून मैदानावर शाळेच्या नावाच्या आकृतीत दिव्यांची मांडणी करून रोषणाई केली.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन दिवसाची सांगता झाली.
वरील प्रसंगी शाला समितीचे अध्यक्ष. अजय पुरोहित सर, महामात्र डॉ.गोविंद कुलकर्णी सर आणि मएसो नियामक मंडळ सदस्य . राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य.पी.बी. कुलकर्णी सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.