लाचेची मागणी करणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी- पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर
बारामती: इंदापूर येथे लाचलुचपत विभागाच्यावतीने जनजागृती मेळावा संपन्न
लोकसेवकाने कामे करण्याकरिता नागरिकांकडे लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 किंवा पुणे कार्यालयाच्या 020-26132802, 26122134 तसेच 7875333333 या व्हॉटस्अप क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी केले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभागृह इंदापूर येथे आयोजित जनजागृती मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नागरिकांना भ्रष्टाचाराच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करता येते, असे सांगून श्री. निंबाळकर म्हणाले, नागरिकांना विभागाच्या कामकाजाविषयी माहिती होण्याकरीता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी लाच लुचपत विभागाची रचना व कार्यपद्धती विषयी माहिती दिली. अशा प्रकारच्या मेळाव्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व नागरिकांमधील दरी कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांमध्ये विभागाविषयी असलेले गैरसमज, शंकाचे त्यांनी निराकरण केले.
विभागाकडे तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच त्या प्रकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. निंबाळकर म्हणाले.
विभागाच्यावतीने तालुक्यात सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी, शासकीय कार्यालय, शाळा व महाविद्यालय, बाजारपेठ आदी ठिकाणी जनजागृतीच्या अनुषंगाने हस्तपत्रिका, भिंतीपत्रके वितरीत करण्यात आल्या.