बारामती - माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीने राज्य शासनाला सादर केलेल्या वाढीव पाणीपुरवठा प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार नगरपंचायतीच्या हद्दीतील पुढील ५० वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करता वाढीव पाणीपुरवठा प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. यामुळे नगरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
या योजनेमुळे प्रति व्यक्ती प्रति दिन १३५ लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. या नवीन प्रकल्पांतर्गत साठवण तलाव परिसरातील पाणी वितरणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साठवण टाक्या तसेच पाणी वितरणासाठी अत्याधुनिक एचडीपीई पाईप तसेच तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट दर्जाची पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येणार आहे. यासाठी माळेगाव पंचक्रोशीतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याच्या अनुषंगाने नगरपंचायत प्रशासनाने पाठपुरावा केला होता, अशी माहिती श्री. लोंढे यांनी दिली आहे.