Type Here to Get Search Results !

बारामती ! शिक्षणामुळे तर्कनिष्ठ विचारांसह चिकित्सक व संशोधक वृत्ती विकसित होते - वैभव नावडकर

बारामती ! शिक्षणामुळे तर्कनिष्ठ विचारांसह चिकित्सक व संशोधक वृत्ती विकसित होते - वैभव नावडकर
बारामती - शिक्षणामुळे आपल्या अंगी तर्कनिष्ठ विचार उदयास येतात, चिकित्सक व संशोधक वृत्ती विकसित होते, असे प्रतिपादन उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले. 

कवी मोरोपंत सभागृह येथे आयोजित अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कार्यशाळा व जनजागृती शिबीराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, बारामतीचे गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, इंदापूरचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, समितीचे राज्य सचिव वैभव गीते, विशेष सरकारी वकील, बापूसाहेब शीलवंत, अमोल सोनवणे, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. 

श्री. नावडकर म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाजाला शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. तोच वारसा पुढे नेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि सर्व जाती-धर्मातील नागरिकांना एकत्रितपणे शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.  

शिक्षणामुळे आपण स्वावलंबी होऊन स्वाभिमानी होतो, चांगला नागरिक होण्यासोबत सुसंस्कृत समाज निर्माण होण्यास मदत होते. समाजात वाचनसंस्कृती विकसित होण्याकरीता सतत वाचन करणे गरजेचे आहे. समाजातील अपप्रवृत्ती, गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्याकरीता पालकांनी मुलांसोबत संवाद साधावा, मोबाईलच्या अनावश्यक वापरापासून मुलांना दूर ठेवावे. त्यांना चांगल्या, वाईटातील फरक समाजावून सांगितला पाहिजे, असेही ते म्हणाले. 

आपल्या परिसरात एखादी घटना घडल्यास जबाबदार नागरिक या नात्याने तात्काळ प्रशासनास कळवावे जेणे करुन परिस्थिती नियंत्रणास आण्यास मदत होते, या कार्यशाळेतील ज्ञानाचा उपयोग गावाच्या विकासाकरीता करावा. दोन समाजातील वाद टाळण्याकरीता पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन श्री. नावडकर म्हणाले. 

डॉ. राठोड म्हणाले, गावातील तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक, पोलीस पाटील आदी घटकांनी जागृत राहून काम केल्यास अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत घडणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. संविधानातील समता, बंधुता, न्याय या संकल्पनेचा पुरस्कार केला पाहिजे. समाजात अन्यायाला वाचा फोडण्याकरीता जबाबदार नागरिक या नात्याने न्यायाच्या बाजूने उभे राहावे. अशा घटनांबाबत पोलीस प्रशासनास तात्काळ माहिती द्यावी, पोलीस प्रशासनास आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असेही  डॉ. सुदर्शन राठोड म्हणाले. 

श्री. गीते म्हणाले, आपण पुरोगामी महाराष्ट्रातील नागरिक असून आपल्याला विचाराची एक परंपरा आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत नागरिकांना विविध अधिकार देण्यात आले आहेत, त्यामुळे त्या अधिकाराचे प्रबोधन झाले पाहिजे, समाजात घडणाऱ्या विपरित घटनेबाबत जागरूक राहावे, कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात पीडिताला न्याय मिळाला पाहिजे, याकरीता नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. गीते म्हणाले. 

 ॲड. शिलवंत म्हणाले, भारतीय संविधानाने आपल्याला निर्भयपणे जीवन जगता यावे याकरीता अधिकार दिले आहेत. समाजातील अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांवर होणारे अत्याचार, अन्याय कमी करण्याकरीता प्रयत्न करावेत, याबाबत समाजात जनजागृती करावी, असे ते म्हणाले. 

ॲड. सोनवणे यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण  कायद्याबाबत (पोक्सो) माहिती दिली.

डॉ. अनिल बागल यांनी प्रास्ताविक केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test