बारामती : श्री गणेश विसर्जनासाठी नगरपरिषदेकडून शहरातील विविध बत्तीस ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदासह निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे, नागरिकांनी पर्यावरणाच्यादृष्टीने त्याचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
शहरात सुमारे २०० पेक्षा अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे गणेशमूर्तीची संख्या विचारात घेता प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य व इतर कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी कृत्रिम विसर्जन हौदांची निर्मिती व निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली आहे.
पर्यावरण पूरक विसर्जन मिरवणूक व विसर्जन करणाऱ्या मंडळांना यावर्षी नगरपालिकेच्या वतीने बक्षीसे जाहीर करण्यात आली आहेत.यामध्ये १५ हजार, १० हजार व ७ हजार रोख रक्कम प्रमाणपत्र व शिल्डचा समावेश आहे. डीजेमुक्त आणि पारंपरिक वाद्याच्या वापर करण्याबाबतची मुख्य अट ठेवण्यात आली आहेत.
गणपती विसर्जन विहिरीजवळ १० नियंत्रण अधिकाऱ्यांसह कर्मचारी व शहरातील ३२ ठिकाणी विसर्जनाच्या वेळी मदतीसाठी २०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक व शांततेत पार पडणाऱ्या आणि नियमाच्या अधीन राहून विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या तीन गणेश मंडळांना उत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
*कृत्रिम जलकुंडाची ठिकाणे*
शहरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांदुळवाडी आणि शिवाजीनगर, चिंचकर शाळा, तांदुळवाडी, कवी मोरोपंत शाळा, श्रीरामनगर, रुई क्षे. कार्यालय समोर, अभिमन्यू कॉर्नर (बनकर वडेवाले जवळ ), सूर्यनगरी मंडई शेजारी, अंगणवाडी, सी.टी. इन चौक, जळोची क्षेत्री कार्यालय, जि.प. प्राथ.शाळा, माळावरची देवी मंदिरालगत, गणेश मंदिरा समोर, सायली हिल, सहयोग सोसायटी गेट समोर ख्रिश्चन कॉलनी, जेष्ठ नागरीक संघ कार्यालय, कॅनॉल शेजारी, वीर गोगादेव मंदिराजवळ, रिंगरोड कॅनॉल पुलाजवळ, शाहू हायस्कूल, पाटस रोड, दशक्रिया विधी घाट, कसबा, देशमुख समाज मंदिर शाळा क्र. ०१, खरेदी विक्री पेट्रोलपंपा शेजारी, खंडोबानगर मुख्यचौक, टेक्लीकल हायस्कुल, बालकल्याण केंद्र प्राथमिक शाळा, मुक्ती टाऊनशिप फेज २, धों. आ. सातव शाळा, जगतापमळा, परकाळे बंगला, माता रमाई भवन, तीन हत्ती चौक, तुपे बंगला समोर, अशोक नगर, पंचायत समिती समोर भारत बेकरी, मोरगांव रोड धावजी पाटील कॅनाल पुल, श्री. पांचगणे पत्रकार कॅनाल बाजूस, सातव वस्ती जि.प. शाळा आणि शाळा क्र. २ कसबा या ठिकाणी
कृत्रिम जलकुंडाच्या व्यवस्था करण्यात आली आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी सर्व मिरवणूक मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी इतर अडथळे, झाडांच्या फांद्या, झाडे-झुडपे काढून घेण्यात आल्या आहेत.
घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणपती विसर्जनासाठी शहरात व क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यकक्षेत कृत्रिम विसर्जन हौद व निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. तसेच आवश्यकतेनुसार कॅनॉल व नदीपात्राच्याकडेला बॅरिकेडिंग उभे करण्यात आले आहेत. कॅनॉल व नदी पात्रात पूर्णवेळ सुरक्षेसाठी सतर्क असणार असून अग्निशमन विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहेत.