साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन
रक्तदान करण्याचेही प्रशासनाचे आवाहन
बारामती : तालुक्यात डेंग्यू, चिकनगुण्या, झिका या आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.
पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार त्यातून रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने ग्रामपंचायत, नगर परिषदस्तरावर आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकामार्फत दैनंदिन किटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयित डेंग्यू, चिकनगुण्या, झिका रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे.
नागरिकांना साथीच्या आजाराच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत आरोग्य शिक्षण देण्यात येत आहेत. गाव, प्रभागातील जूने टायर नष्ट करणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे आदी कार्यवाही करण्यात येत आहेत. तुंबलेली गटारे नगर परिषद व ग्रामपंचायतीमार्फत वाहती करणे, आवश्यकतेनुसार त्यात जळके ऑईल किंवा वंगण टाकण्यात येत आहेत.
गावात एकाच वेळेस कोरडा दिवस पाळणे, धूरफवारणी करण्याबाबत सर्व ग्रामपंचायतीला सुचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यू, चिकनगुण्या तपासणी कक्ष स्थापन करून रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहे. वैद्यकीय महाविद्यालय येथे स्वतंत्र उपचार कक्ष स्थापन करून अतिगंभीर डेंग्यू रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
डेंग्यु रुग्णांना प्लेटलेट, रक्ताचा तुटवडा जाणवू नये याकरीता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे ४ व ५ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या शिबारात सहभागी होत रक्तदान करण्याचे आवाहनही श्री. नावडकर यांनी केले.
0000