बारामतीतील हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..
बारामती - बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम मध्ये गुरुवार दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ७.३० प्रमुख पाहुणे . महादेव गाढवे (निवृत्त ऑर्डिनरी कॅप्टन व उपाध्यक्ष बारामती सैनिक सेल) यांच्या हस्ते व शाळेचे महामात्र मा.डॉ. गोविंद कुलकर्णी सर आणि मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व ध्वजवंदन झाले. या वेळी विद्यार्थीनींनी राष्ट्रगीत व ध्वजगीत यांचे सुस्वर गायन केले. विद्यार्थ्यांच्या संचलन पथकाची पाहणी प्रमुख पाहुण्यांनी केली.या नंतर ध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांनी संचलन केले.
तद्नंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर इ.३री च्या विद्यार्थिनी कु.कादंबरी वाबळे आणि कु. ध्रुवा उंडे यांनी देशभक्तीपर गीत शाळेची माध्यम भाषा इंग्रजी मध्ये सादर केले. इ.१ली व २री च्या सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, परंपरा आणि विविधता यांचे त्याचबरोबर भारताचे नाव जगभरामध्ये गाजवणाऱ्या प्रसिद्ध खेळाडूंची वेशभूषेतील विलोभनीय दर्शन घडविणारी शोभायात्रा सादर केली.
शोभा यात्रेनंतर विद्यार्थ्यांनी तिरंगी रुमाल व कवायत साहित्य वापरून सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार सादर केले. शाळेमध्ये प्रथमच घेण्यात आलेला आणि रोमांचित करणारा अनुभव सर्वांनी घेतला तो म्हणजे घोष पथक आणि बँड पथक यांचे उत्कृष्ट सादरीकरण होय. शाळेत पहिल्यांदाच होणारा वाद्यपथकाचा श्रवणीय आणि तालबद्ध कार्यक्रम सर्वांचे मन जिंकणारा ठरला.
कार्यक्रमात पुढे मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना भारताचे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आणि जबाबदारी सांगत देशभक्तीचे महत्व विशद केले.
यानंतर स्वातंत्र्यसंग्रामामध्ये प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण तसेच कारगिल युद्धातील हुतात्मा जवानांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे भाषण शाळेच्या कु. मुग्धा एकशिंगे या इ. ८वी तील विद्यार्थिनीने केले. सत्कारास उत्तर देताना प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी त्यांचा लष्कर सेवेतील अनुभव आणि कारगिल युद्धातील काही प्रसंग नमूद केले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. गोविंद कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि इतर सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण विद्यार्थ्यांना करून देऊन तिरंगा झेंड्यातील रंगांचे महत्त्व विशद केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका प्राची चिन्मय नाईक यांनी केले.
सदर कार्यक्रमात पालकांचा ही उत्स्फूर्त असा सहभाग होता. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या राखी प्रदर्शन व विक्रीला ही पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
संपूर्ण कार्यक्रम नियोजनबद्ध होण्यासाठी शाळा समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित सर, महामात्र मा.डॉ.गोविंद कुलकर्णी सर, म ए सो नियामक मंडळ सदस्य . राजीव देशपांडे सर,स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पी.बी. कुलकर्णी सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.