बारामती ! दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्याकरीता तालुका प्रशासन कटीबद्ध- तहसीलदार गणेश शिंदे
बारामती - दिव्यांगाच्या अडीअडचणी सोडविण्याकरीता तालुका प्रशासन कटीबद्ध असून त्यांच्या प्रलंबित विषयांबाबत सर्व संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.
महसूल पंधरवड्यानिमित्त तहसील कार्यालय येथे आयोजित 'एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा' कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग लाभार्थी शिबीराच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी नायब तहसीलदार विलास करे, नायब तहसीलदार स्वाती गायकवाड, सुवर्णा ढवळे, पंचायत समिती कार्यालयाचे दिव्यांग समन्वयक संदिप शिंदे आदी उपस्थित होते.
दिव्यांग समन्वयक श्री. शिंदे म्हणाले, महसूल व वन आणि समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांच्या समस्या सोडविण्याकरीता एकत्रित पद्धतीने काम करण्यात येईल. दिव्यांगांना जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारा निर्वाह भत्ता, संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता असलेली शिष्यवृत्ती, दिव्यांग बीज भांडवल योजना आदी योजनांबाबत त्यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमात १३ दिव्यांग नागरिकांना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ देण्यात आला. तसेच ९ दिव्यांग नागरिकांना प्रातिनिधीक स्वरुपात अंत्योदय शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. दिव्यांगांना प्रातिनिधीक स्वरुपात दाखले, प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.