Type Here to Get Search Results !

उद्योगांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे....उद्योगांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे यंत्रणांना निर्देश

उद्योगांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
उद्योगांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे यंत्रणांना निर्देश

पुणे, पुणे जिल्ह्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची संख्या मोठी असून या उद्योगांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेत मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यासह नोकरी इच्छुक युवांना रोजगार देण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. यंत्रणांनी उद्योगांच्या पाणी, वीज, रस्ते, वाहतूक कोंडी आदी समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा उद्योग मित्र समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग अधिकारी वर्षा सोने, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदींसह विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, पुणे जिल्हा हा मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास झालेला जिल्हा आहे. उद्योगवाढीसाठी मुबलक पाणी, चांगले रस्ते, कामगारांना कामाच्या ठिकाणी येण्यासाठी कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा आदी बाबी आवश्यक असतात. त्यादृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए, पीएमपीएमएल, वाहतूक पोलीस, जिल्हा उद्योग केंद्र आदींनी समन्वयाने याबाबत काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

तत्पूर्वी सचिन जाधव यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या युवांना रोजगार तसेच उद्योगांना मनुष्यबळ उपलब्ध करुन घेता येईल. या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार असल्याने उद्योगांना त्यावर अधिकचा खर्च करण्याची गरज राहणार नाही, असे ते म्हणाले.

जिल्हा उद्योग पुरस्कार 2022 अंतर्गत प्रथम पुरस्कार प्राप्त पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीसचे प्रसाद कामठे आणि द्वितीय पुरस्कार घोषित झालेल्या एफिसिएन्ट इंजिनिअरिंगच्या शालिनी सौंदाडे यांना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या हस्ते पुरस्काराचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test