शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या ‘पीएम- किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १ हजार ६९८ कोटी ७० लाख रुपये जमा
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना राज्यात १ डिसेंबर २०१८ पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली. त्याला जोड म्हणून राज्य शासनानेही ३० मे २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्यास मान्यता देऊन त्याप्रमाणे योजनेची सुरुवात केली. या दोन्ही योजनांचे मिळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १ हजार ६९८ कोटी ७० लाख रुपये जमा झाले आहेत.
लाभ घेण्यास पात्र व्यक्ती
या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचे (पती-पत्नी व त्यांचे १८ वर्षाखालील अपत्य) लागवडीलायक एकूण धारण क्षेत्र २ हेक्टरपर्यंत आहे अशा पात्र शेतकरी कुटुंबियांस २ हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात एकूण ६ हजार रुपये प्रतीवर्षी लाभ देण्यात येतो. लाभार्थ्यांना द्यावयाच्या लाभाची गणना केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येते.
लाभ मिळण्यास अपात्र व्यक्ती
या योजनेकरीता जमीन धारण करणारी संस्था, संवैधानिक पद धरण करणारे किंवा केलेले आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, खासदार, राज्यसभा सदस्य, विधानसभा, विधानपरिषद सदस्य, महापौर, जि. प. अध्यक्ष तसेच केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थेच्या अखत्यारितील कार्यालयातील आणि स्वायत्त संस्थांचे तसेच स्थानिक स्वराज संस्थांमधील नियमित अधिकारी, कर्मचारी, मागील वर्षी आयकर भरलेली व्यक्ती, ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन १० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असणारे निवृत्तीवेतनधारक, नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ आदी क्षेत्रातील व्यक्ती लाभ मिळण्यास अपात्र आहेत.
शेतकऱ्यांच्या खात्यात १ हजार ४५० कोटी ५० लाख रुपये जमा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ५१ शेतकरी पात्र आहेत. त्यांच्या बँक खात्यात आजपर्यंत १ हजार ४५० कोटी ५० लाख रुपयांचा लाभ जमा करण्यात आला आहे. आंबेगाव तालुक्यात ३६ हजार ९०३ शेतकऱ्यांच्या खात्यात १०९ कोटी ३० लाख रुपये, बारामती- ५१ हजार २७ शेतकरी १७३ कोटी ७० लाख, भोर- २४ हजार ९७० शेतकरी ७७ कोटी, दौंड ४२ हजार ६०६ शेतकरी १४६ कोटी ५० लाख, हवेली- १० हजार ५५१ शेतकरी ४३ कोटी ५० लाख, इंदापूर ४७ हजार ३२ शेतकरी १६३ कोटी, जुन्नर- ५२ हजार ५८६ शेतकरी १७३ कोटी ८० लाख, खेड- ४४ हजार ५४५ शेतकरी १४८ कोटी २० लाख, मावळ- १७ हजार ५३२ शेतकरी ५७ कोटी ५० लाख, मुळशी- १३ हजार १४७ शेतकरी ५६ कोटी ५० लाख, पुरंदर- ३१ हजार ९४२ शेतकरी ९७ कोटी ९० लाख, शिरुर- ५२ हजार ४५० शेतकरी १७३ कोटी ४० लाख आणि वेल्हे तालुक्यात ८ हजार ७६० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३० कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात आले आहेत.
*पीएम-किसानला राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची जोड*
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्याचा निर्णय ३० मे २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून प्रति वर्ष रक्कम ६ हजार रुपये लाभ दर चार महिन्यांनी २ हजार रुपये अशा वार्षिक समान तीन हप्त्यात पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च यप्रमाणे २ हजार रुपये जमा करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पी.एम. किसान पोर्टलवर नोंदणी करणे, पात्र लाभार्थीना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. संनियंत्रणासाठी ग्राम, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
*‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून २४८ कोटी २० लाख रुपयांचा लाभ*
जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ई-केवायसी, आधार संलग्न व भूमी अभिलेख नोंदी आदी सर्व बाबीची पूर्तता करण्यात आली असून आज रोजी एकूण ४ लाख ३९ हजार ६५३ शेतकरी पात्र आहेत. त्यांच्या बँक खात्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून एकूण २४८ कोटी २० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
*संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी*- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरीता केंद्रशासनाच्यावतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य शासनाच्यावतीने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनाअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १ हजार ६९८ कोटी ७० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.