सोमेश्वरनगर ! काकडे महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध दिवस साजरा
सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालयातील रॅगिंग प्रतिबंध समितीच्या वतीने राष्ट्रीय रॅगिंग प्रतिबंध दिवस साजरा करण्यात आला. विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे रॅगिंग प्रतिबंध संदर्भात जनजागृती करण्यासाठी दि. १२ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय रॅगिंग प्रतिबंध दिवस म्हणून साजरा करावा व १२ ते १८ ऑगस्ट या कालावधी दरम्यान रॅगिंग प्रतिबंधात्मक जनजागृती सप्ताह आयोजित करण्याबाबतचे परिपत्रक सर्व महाविद्यालयांसाठी काढण्यात आले आहे. याच्याच अंमलबजावणीचा भाग म्हणून महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पोर्टलवर उपलब्ध असलेला रॅगिंग प्रतिबंधासंदर्भात लघुचित्रपट दाखविण्यात आला. तसेच, रॅगिंग प्रतिबंधात्मक जगजागृती सप्ताहाच्या निमित्ताने घोषवाक्य, निबंधलेखन, भित्तीपत्रके व नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शित करणे यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व आपल्या महाविद्यालयामध्ये रॅगिंग सारखे प्रकार घडत नाहीत. तसेच, रॅगिंग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महाविद्यालयात प्रत्येक वर्षी प्रवेश घेतेवेळी आपण विद्यार्थी व पालकांचे प्रतिज्ञापत्र घेत असतो असे प्रतिपादन केले. विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. जगन्नाथ साळवे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सचिव श्री. सतीश लकडे, प्रा. प्रियंका होळकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी केले व आभार प्रा. चेतना तावरे यांनी मानले.