सोने खरेदीसाठी बँकेमार्फत कर्ज सुविधा उपलब्ध व्हावी - किरण आळंदीकर
इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन IBJA ची मागणी
परंपरे प्रमाणे कोणाच्याही घरात मुलामुलींचे लग्न असले कि थोडे फार का होईना लग्नाच्या दागिन्यांची खरेदी करावी लागते,कधी कधी घरामध्ये अचानक लग्नाचा योग जुळून येतो अशा वेळी लग्नाचे कर्तव्य पार पाडत असताना आणि खर्चाची तरतूद करताना वधू - वर पित्याची दमछाक होते, वेळप्रसंगी उसणवारी करण्याची, मिळेल तेथून कर्ज घेण्याची कुटुंबावर वेळ येते, अशा वेळी जर बँकांनी एखादी नियमावली तयार करून दागिने खरेदी साठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली तर सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. तसेच इतर सुविधाही देण्यात यावी, अशी इब्जा या राष्ट्रीय सराफ असोसिएशन ची मागणी असल्याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले.
नुकतीच मुंबई येथे इब्जा च्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये ग्राहक व सराफ व्यावसायिक यांच्या हितासाठी सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडण्याचा निर्णय झाला. केंद्र सरकारकडून अनेक मागण्यांची अपेक्षा असल्याचे इब्जा चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले. या दृष्टीने महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात किरण आळंदीकर म्हणाले,
सराफ व्यवसायिकांसाठी संपूर्ण देशात हॉलमार्क कायदा सक्तीचा करण्यात आला आहे. मात्र अद्याप हि अनेक ठिकाणी पायाभूत सुविधाचा अभाव असल्याचे मेहता यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.
आळंदीकर व इब्जा चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष बागडे
पुढे म्हणाले, सराफ व्यवसायिकांना अनेक प्रकारच्या करांचा भरणा राज्य सरकार, केंद्र सरकार कडे करावा लागतो. यासाठी स्वतंत्र एक खिडकी योजना आणल्यास सोपस्कर होऊन सराफ व्यवसायिकांना दिलासा मिळेल. हॉलमार्क मिळविताना येणाऱ्या अडचणीतून सुटका व्हावी तसेच सोन्यावरील आयात शुल्क कमी व्हावे , अशी हि मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.