मतदान केंद्रातील बदलाबाबत मतदारांना अवगत करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
पुणे - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरु असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रावर मतदारांची संख्या साधारण समान करण्याच्या प्रक्रियेद्वारे जिल्ह्यातील ६६२ मतदान केंद्रावर काही मतदारांच्या मतदान केंद्रात बदल होणार असून त्यांना त्याच इमारतीतील दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे. या बदलाची माहिती मतदारांना द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘स्वीप’ कार्यक्रमाच्या समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त महेश पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अर्चना तांबे आदी उपस्थित होते.
डॉ.दिवसे म्हणाले, एकाच इमारतीत असलेल्या मतदान केंद्रात कमी जास्त प्रमाणात मतदार संख्या असते. त्यामुळे एका केंद्रावर खूप गर्दी असते तर दुसऱ्या ठिकाणी लवकर मतदान होते. हे टाळण्यासाठी त्या इमारतीतील प्रत्येक मतदान केंद्रावर समान प्रमाणात मतदार संख्या असावी यासाठी ही सुसूत्रीकरणाची प्रक्रिया करण्यात आली आहे. अशा मतदान केंद्रांची संख्या ६६२ आहे. केलेल्या बदलानुसार मतदान केंद्र जरी बदलले तरी त्याच इमारतीत असलेल्या दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदाराला मतदान करता येणार आहे. त्यामुळे मतदारांना त्यांच्या बदललेल्या भाग क्रमांकाची माहिती देण्यात यावी. त्यासाठी मतदार चिठ्ठी तयार करण्यात येणार असून ती मतदान केंद्र बदललेल्या प्रत्येक मतदारापर्यंत मोहिम स्वरुपात पोहोचविण्यात यावी.
याच प्रक्रियेअंतर्गत ४६० मतदान केंद्रांच्या जागेत बदल करण्यात आला आहे. एकाच ठिकाणी अधिक संख्येने मतदान केंद्र असलेल्या इमारतीतील काही मतदान केंद्रे जवळ असलेल्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. त्याबाबतही मतदारांना माहिती द्यावी. २४२ नवीन मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत, तर ११७ मतदान केंद्र सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात स्थापन करण्यात येणार आहेत. पुढील महिनाभरात या संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांची मदत घेवून मतदारांना बदलाची माहिती द्यावी.
विधानसभा निवडणूकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील प्रत्येक बदल मतदारांपर्यंत पोहोचवावे. विशेषत: पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात यासाठी विशेष मोहिम राबवावी. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदारांची भेट घेवून त्यांना बदलाची माहिती घ्यावी. मतदार मतदान केंद्र परिसरात रहात नसल्यास किंवा मतदान केंद्र दूर असल्यास त्यांच्याकडून नमुना अर्ज क्र.८ भरून घ्यावा.
मतदार यादी सुसूत्रीकरणाबाबत राजकीय पक्षांनी चांगल्या सूचना केल्या आहेत, त्याबाबतदेखील आवश्यक त्या दुरूस्त्या करण्यात याव्यात. 85 वर्षापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदरांची भेट घेवून गृह मतदानाबाबत माहिती घ्यावी. मतदार नोंदणी झालेल्या प्रत्येक मतदाराला सुलभपणे मतदान करता येईल यासाठी ही मोहिम व्यापक प्रमाणावर राबवावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.