'संवादवारी'तून लोककल्याणकारी शासनाच्या योजनांचा जागर ; अंथुर्णे येथे प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद
पुणे : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना, उपक्रमांचा प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन , कलापथक, पथनाट्यच्या माध्यमातून 'संवादवारी' उपक्रमांद्वारे जागर सुरू आहे. आज इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे प्रदर्शनासह या सर्व माध्यमांना वारकरी व ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
चित्ररथरथाची रचना आणि त्यावर कलात्मकतेने दिलेली माहिती वारकरी बांधव कुतूहलाने पाहत आहेत. कलापथकाच्या सादरीकरणाला टाळ्या मिळत असून योजनांची माहिती व मनोरंजन अशी सांगड घातली जात आहे. पथनाट्य हे नागरिक आणि कलाकारांमधील अंतर दूर करत असल्याने योजना अधिक चांगल्याप्रकारे समजत आहेत.
वारकरी आणि नागरिक प्रदर्शनाला आवर्जुन भेट देत असून योजनांची माहिती जाणून घेत आहेत. प्रदर्शनाची मांडणी आणि मिळणाऱ्या नवीन माहितीमुळे प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
पालखी सोहळ्यासोबत असलेला चित्ररथही वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षण आहे. चित्ररथावर समोरच्या बाजूस विठ्ठलाची प्रतिमा असल्याने वारीसोबत असलेल्या भाविकांची पावले चित्ररथाकडे वळतात. एका चित्ररथावर मंदिराच्या रचनेप्रमाणे स्तंभ उभारण्यात आले आहेत, तर दुसऱ्या चित्ररथावर दीपमाळ, मांगल्याचे प्रतिक आणि पर्यावरण समृद्धीचा संदेश देणारा पिंपळवृक्ष प्रदर्शित करण्यात आला आहे. पिंपळाच्या पानावर शासनाच्या विविध योजना दर्शविण्यात आल्या आहेत. चित्ररथावर असलेले लोककलावंत विठुनामाचा गजर करत वारकऱ्यांना माहिती देतात. अनेक ठिकाणी वारकरी चित्ररथासोबत छायाचित्र घेताना दिसत आहेत.
वारीसोबत चालणाऱ्या एलईडी व्हॅनवरील मोठ्या पडद्यावर दृकश्राव्य चित्रफीतीच्या माध्यमातून योजनांची माहिती दिली जाते. लोककला पथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी भजन, विठुनामाच्या गजरासोबत रंजक पद्धतीने शासकीय योजनांची माहिती दिली जाते आणि त्यासोबत स्वच्छता आणि आरोग्याचे संदेशही देण्यात येतात. त्यामुळे या पथकासभोवतीही गर्दी दिसून येत आहे. विसाव्याच्या ठिकाणी थकवा दूर करताना वारकरी बांधवांचे मनोरंजनही होते आणि सोबत विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याने ‘संवादवारी’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
*प्रेमरत्न भोसले, अंथुर्णे, पुणे:*
शासनाच्या अनेक योजनांची नव्याने माहिती झाली. आपला दवाखाना, रुग्णवाहिका तसेच वारकऱ्यांसाठी शासनाने केलेल्या सोयी चांगल्या आहेत. योजनांची माहिती नातेवाईक, मित्रांना देईन .
*सुनील काळे, सोलापूर:*
अतिशय चांगल्या प्रकारे पोस्टर्स लावून प्रदर्शनातून शासनाच्या योजनांची माहिती दिली जात आहे. नुकतीच सुरू केलेली लाडकी बहिण योजना यासोबतच घरकुल योजना, शेतकरी, आरोग्याच्या योजना आदी सर्व योजनांची माहिती मिळत आहे. पथनाट्य, चित्ररथाद्वारे माहिती मिळत आहे.