सोमेश्वरनगर - बारामती तील निंबुत येथील सूंदर या बैल व्यवहाराच्या वादातून झालेल्या गोळीबारातील फरार असलेला मुख्य आरोपी गौतम काकडे यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री भोर परिसरातून गौतम काकडे यांना एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. सुंदर नावाच्या बैल खरेदी व्यवहारात गौतम काकडे आणि फलटण येथील रणजीत निंबाळकर यांच्यात वाद निर्माण झाला होता. यावेळी गौतम काकडे यांचा लहान भाऊ गौरव काकडे यांनी गोळीबार केल्याने रणजीत निंबाळकर गंभीर जखमी झाले होते. शनिवार दिनांक 28 रोजी पहाटे रणजीत निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे बैलगाडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. यातील आरोपी गौरव काकडे तसेच ज्यांच्या बंदुकीतून हा गोळीबार करण्यात आला ते सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजी काकडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी गौतम काकडे फरार झाला होता. त्यांच्या मागावर पोलिसांची आठ पदके रवाना करण्यात आली होती. या घटनेने बैलगाडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. रणजीत निंबाळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन समोर शनिवारी मोठा जनसमुदाय जमा झाला होता. मुख्य आरोपीला पोलीस अजूनही का अटक करू शकत नाहीत, सुंदर बैल आमच्या ताब्यात द्या, आरोपींना पाठीशी घालू नका, अशा अनेक मागण्या रंजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी केल्या होत्या. पोलिसांनीही आमचा तपास सुरू असून लवकरच आरोपीला अटक करू असे आश्वासन दिले होते. रविवारी मध्यरात्री पोलिसांनी गौतम काकडे याला अटक केली आहे.
या गुन्ह्यात या आधी पोलीस कोठडीत असलेले शहाजी काकडे व गौरव काकडे यांच्या कोठडीची आज मुदत संपत आहे . या दोघांनाही आज कोर्टात हजर केले जाणार आहे. एकूणच या गुन्ह्यातील सर्व आरोपी आता अटक करण्यात आले असून आता पोलिसांना पुढील तपास आणखी लवकर करता येणार आहे. गौतम काकडे याच्यावर राजकीया क्षेत्रात जवळचे सबंध असल्याने नागरिकांनमध्ये अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र पोलिसांनी गौतम काकडेला अटक करून सर्व चर्चेंना सध्यातरी बंध होणार असल्याचे दिसत आहे.