Type Here to Get Search Results !

वारकऱ्यांना पाणी, स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासह सुरक्षेची काळजी घ्या- जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

वारकऱ्यांना पाणी, स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासह सुरक्षेची काळजी घ्या- जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
पुणे।: जिल्ह्यात वेळेत पाऊस सुरू झाल्याचे पाहता पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालये, वाहतूक, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा पुरविण्यासह त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते. 

पालखी सोहळा सुरक्षित व्हावा यासाठी सर्व संबंधित तालुक्यांनी इन्सीडन्स रिस्पॉन्स सिस्टीमचा (आयआरएस) प्रभावी उपयोग करावा. सोहळ्यातील संबंधित विभागविषयक निश्चित कामकाजासाठी संपर्क अधिकारी नेमून त्याला पालखी सोहळ्यासंबंधित जबाबदारी द्यावी जेणेकरुन समन्वय साधताना गोंधळ होणार नाही. 

पाऊस पडत असल्याचे लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याचे स्रोत तपासून ते निर्जंतूक करुन घ्यावेत. पाणीपुरवठ्यासाठी आवश्यकता असल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करता येतील. पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत वाढ करण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड मनपा तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.

तात्पुरत्या शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. पुढील गावी शौचालयांच्या वाहतुकीसाठी योग्य वाहतूक आराखडा (ट्रान्झिट प्लॅन) तयार करा. आपल्या घरातील शौचालये वारकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यास पालखी मार्गावरील इच्छुक नागरिकांच्या घरांना वेगळे मार्किंग करा. वारी पुढे गेल्यानंतर मागील गावातील स्वच्छतेवर विशेष भर द्यावा, असेही ते म्हणाले.

पालखी मार्गावरील दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तात्काळ काढून टाकण्यात यावीत. सुरक्षेच्यादृष्टीने मार्गावरील, नगरपालिका हद्दीतील सर्व जाहिरात फलकांची (होर्डिंग्ज) तपासणी करावी. अवैध आणि असुरक्षित सर्व जाहिरात फलक काढून टाकावेत. पालखीला अडथळा येऊ नये आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालखी महामार्गावरील कामे पूर्ण करण्यासह अडथळे काढावेत. एनएचएआयने पोलीस, उपविभागीय अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करुन त्यानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही ते म्हणाले.

अन्न व औषध प्रशासन विभागाने मार्गावरील सर्व हॉटेल्समधील खाद्यपदार्थांची नियमित तपासणी करत रहावे. त्रुटी आढळलेल्या ठिकाणी कठोर कारवाई, प्रसंगी अनुज्ञप्ती रद्द करा. आपत्कालीन व्यवस्थेसाठी आळंदी येथे एनडीआरएफ तसेच इतरत्र गृहरक्षक दलाच्या जवानांची आपदा मित्रांची मदत घ्या. रात्री गरजेच्या ठिकाणी मोठी प्रकाशव्यवस्था करण्यासाठी नगरपालिकेकडील लायटिंग टॉवरचा उपयोग करावा, असेही ते म्हणाले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा आदींबाबत माहिती सादरीकरणाद्वारे दिली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी १ हजार ५००, संत तुकाराम महाराज पालखीसाठी १ हजार आणि संत सोपान महाराज पालखीसाठी पालखीमुक्कामी, विसाव्याच्या ठिकाणी २०० शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. तिन्ही पालख्यांसाठी मिळून १२ तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. पाण्याचे स्रोत, वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, फिरते आरोग्य पथक, औषधे, रुग्णवाहिका यांची आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे. स्तनदा माता आणि बालकांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

पालखी तळाचे सपाटीकरण, इंधन आणि वीज पुरवठा, शोषखड्डे, तात्पुरता निवारा केंद्र, आरोग्य किट आदींची माहिती यावेळी देण्यात आली. १४० रुग्णवाहिका आणि ५७ रुग्णवाहिका पथक, ११२ वैद्यकीय अधिकारी, ३३६ आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २०० टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही यावेळी श्री. पाटील यांनी सांगितले. पालखीसाठी तसेच पोलीसांसाठी तालुकास्तरावर देण्यात आलेले तात्पुरते तंबू (टेन्ट्स) देण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

पोलीस अधीक्षक श्री. देशमुख यांनी पालखी बंदोबस्त, वाहतूक आराखडा, पालखी महामार्गावर एनएचएआयकडून सुरू असलेल्या कामांच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या उपाययोजना आदींच्या अनुषंगाने माहिती दिली आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढणे, प्रदुषित पाणी वाहून जावे यासाठी धरणातून पाणी सोडणे, पालखी प्रस्थानावेळी उपस्थितीसाठी आळंदी येथे मंदिरात मर्यादित स्वरुपात मंदिर समितीकडून पासेस देणे तसेच प्रस्थानाच्या दिवशी वाहनांना अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय अन्य वाहनांना प्रवेशबंदी आदींच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीस सहायक जिल्हाधिकारी डॉ. पूजा मनोरमा दिलीप खेडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, संबंधित उपविभागांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महानगरपालिका, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरोग्य विभाग, पोलीस, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषध प्रशासन, महावितरण, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test