'पैलतीर' मधील कविता जीवनातील विविध अनुभवांचे चित्रण करणारी - प्रा.प्रदीप पाटील
बारामती प्रतिनिधी :-
रामचंद्र गोविंद पंडित यांच्या 'पैलतीर' या कवितासंग्रहातील कविता नात्यांचे,जीवनमूल्यांचे महत्त्व,निसर्ग आणि वर्तमानातील संघर्ष अशा जीवनातील विविध अनुभवांचे चित्रण करणारी आहे,असे प्रतिपादन
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रसिद्ध कवी प्रदीप पाटील यांनी केले.
साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या संस्थेने आयोजित केलेल्या रामचंद्र गोविंद पंडित यांच्या 'पैलतीर' कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रदीप पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.समारंभाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. सुधाकर बेंद्रे होते.
आपल्या भाषणात पाटील पुढे म्हणाले,
माणसातील हरवत चाललेला संवाद, जगण्यातील अनाथपण,भुकेने होणारे मृत्यू,दारिद्रयाशी,विषमतेशी,
दलालीवृत्तीशी करावा लागणारा संघर्ष यांचेही चित्रण पंडितांच्या कवितेत येते.
महसूल खात्यात काम केलेल्या पंडितांच्या व्यक्तिमत्त्वातील कवीची
संवेदनशीलता आपले लक्ष वेधून घेते.
तसेच अध्यक्षीय मनोगतात संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. सुधाकर बेंद्रे यांनी कवी रामचंद्र पंडित यांच्या 'पैलतीर' या कवितासंग्रहातील कवितांचे अंतरंग उलगडून दाखवले. सद्य सामाजिक व्यवस्थेत लोप पावत चाललेल्या वैचारिक,सांस्कृतिक, कौटुंबिक, सामाजिक उच्च मूल्यांचा ऱ्हास होताना कवीची अस्वस्थता कशी प्रकट झाली आहे. यावर त्यांनी भाष्य केले आहे. नव्या पिढीला हे सारे मार्गदर्शक ठरावे. आणि जुन्या पिढीने आत्मचिंतन करून लोकजीवनाचा ढासळत चाललेला समतोल साधावा. इतके झाले तरी या कवितासंग्रहाचा हेतू साध्य होईल. असे मला वाटते. असे विचार व्यक्त करून कवी रामचंद्र पंडित यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित कृषीनिष्ठ पुरस्काराचे मानकरी संभाजीराव काकडे-देशमुख, साहित्यप्रेमी मंडळाचे अध्यक्ष प्रा. हनुमंत माने, रामचंद्र पंडित तसेच दिवाकर पात्रेकर, सुरेश वांकर, आनंदराव चव्हाण, निखिल गायकवाड, प्रवीण यादव, उज्वल धुमाळ इ. अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक- प्रा.
हनुमंत माने आभार- संजय पंडित व सूत्रसंचालन- सुजित शेख यांनी केले.