बारामती ! इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये भरली पालकांची शाळा
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम शिवम सुंदरा||
वरील सुंदर ओळींची प्रचिती पालकांना करून देत ,दि.२४, २५ व २६जून २०२४ रोजी पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या पालकांची पुन्हा एकदा पालक शाळा भरली.
आपल्या चिमुकल्यांसमवेत पालकांची शाळेत हजेरी लागली. दररोज शाळेच्या गेटवर विद्यार्थ्यांना सोडून घराकडे वळणारी पावले या तीन दिवसांमध्ये शाळेत रमली. सकाळी ०८:४० पासून पालकांची मैदानावर हजेरी होती. प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहत राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा म्हणत बालपणात रंगले. निरोगी शरीरासाठी व्यायाम प्रकार,कवायत व सूर्य नमस्कार घेतले गेले. तद्नंतर सरस्वती स्तवन, स्तोत्र, मंत्र म्हणत मनाच्या एकाग्रतेसाठी उपयुक्त असलेले ॐकार उच्चारण, मेडिटेशन (ध्यान) सर्वांनी केले.
वर्गांकडे वळणारी पावले स्वागत कक्षेतील मनातील भाव दर्शविणाऱ्या भिंतीजवळ स्थिरावली. पालकांच्या उपस्थितीच्या नोंदी ठेवण्यासाठी घेण्यात आलेल्या वैविध्यपूर्ण अशा craft activities करून पालकांनी शाळेच्या इमारतीत प्रवेश केला.
पालक अभिमुखता सत्रात शाळेची ओळख पालकांना करून देण्यात आली. तसेच शालेय कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते हे पालकांना समजावण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या विकासात शाळेबरोबर पालकांचीही भूमिका महत्त्वाची असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांनी अभिमुखता सत्रात सांगितले. पालक म्हणून आपली भूमिका काय व कशी असावी याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले.
आता वेळ झाली जेवणाच्या सुट्टीची. आपल्या पाल्यांसोबत भोजन मंत्र म्हणून भोजनाचा आस्वाद पालकांनी घेतला. सहभोजनानंतर प्रत्यक्ष वर्गकार्याचा अनुभव घेण्यासाठी सर्वजण आपापल्या वर्गात जाऊन बसले, अगदी विद्यार्थ्यांसारखे! सर्व शिक्षकांनी स्व-परिचय देऊन उपक्रम युक्त अध्ययनास सुरुवात केली.
पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या सर्व वर्गांमध्ये पालकांसाठी नाविण्यपूर्ण असे उपक्रम व अभ्यास घेण्यात आला. विविध विषयांशी निगडित, शारीरिक अवयवांचा समन्वय साधणारे, कृतीयुक्त शिक्षणाचा अनुभव देणारे उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारी प्रात्यक्षिके यावेळी पालकांकडून करून घेण्यात आली.
NEP वर आधारित उपक्रमांची माहिती, सण, समारंभ त्याचबरोबर शाळेत घेतले जाणारे उपक्रम व अभ्यास तसेच पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती ही अभिमुखता सत्रात मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांनी सांगितले.
अशाप्रकारे स.०८:४० ते दु.१२:०० वा. पर्यंत बालपणीच्या शालेय आठवणींना उजाळा देत सर्व पालकांनी पालक शाळेचा आनंद लुटला. अशा या अविस्मरणीय पालक शाळेची सांगता वंदे मातरम् या गीताने झाली.
सदर उपक्रमास शाला समितीचे अध्यक्ष मा.श्री.बाबासाहेब शिंदे व महामात्र मा.डॉ.श्री.गोविंद कुलकर्णी सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.