बारामती ! 'जागतिक डेंग्यू दिन व मान्सूनपूर्व तयारी' विषयावर उजळणी कार्यशाळा संपन्न
बारामती प्रतिनिधी: जागतिक डेंग्यू दिनानिमीत्त पंचायत समिती आरोग्य विभागातील तंत्रज्ञ, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक यांची 'जागतिक डेंग्यू दिन व मान्सूनपूर्व तयारी' या विषयावर एक दिवसीय उजळणी कार्यशाळा हिवताप उप पथक, बारामती येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक सुप्रिया सावरकर, आरोग्य निरीक्षक गणेश जाधव, गणेश घोरपडे, आरोग्य सेवक हिम्मत कौले, संदिप बालगुडे आदी उपस्थित होते.
डॉ. खोमणे म्हणाले, ताप असल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात अथवा डॉक्टरकडून उपचार घ्यावेत. मान्सूनपूर्व काळात डास उत्पत्तीचा पारेषण कालावधी अधिक असतो. आरोग्य कर्मचारी यांनी नियमित सर्वेक्षण करावेत, नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा. खासगी प्रयोगशाळा चालकांनी शासकीय दरानुसार डेंग्यू तपासणीचे दर आकारणी करावेत, असे आवाहन डॉ. खोमणे यांनी केले.
श्रीमती सावरकर म्हणाल्या, ताप वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यामुळे ताप आल्यावर अंगावर न काढता त्वरित रुग्णालयात जावून उपचार घ्यावेत.
श्री.जाधव यांनी 'हसत खेळत डेंग्यू वर पाळत' या विषयावर मार्गदर्शन केले. श्री. घोरपडे यांनी 'दैनंदिन किटकशास्त्रीय सर्वेक्षण' विषयी मार्गदर्शन करुन या सर्वेक्षणात सातत्य ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य सेवक शाम उपाध्ये यांनी 'जैविक पद्धतीने डास निर्मूलन व डास प्रतिबंधक वनस्पती' विषयी मार्गदर्शन केले.