नदी पात्रातील मृतदेह शोधमोहीम चालू असतानाच एसडीआरएफ जवानांची बोट पाण्यात बुडाली,तीन जवान शहीद
अकोले तालुक्यातील सुगाव येथे प्रवरा नदी पात्रात बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह शोधण्यासाठी आलेल्या एसडीआरएफ जवानांची बोट पाण्यात बुडाल्याने या पथकातील प्रकाश नाना शिंदे, राहूल गोपीचंद पावरा आणि वैभव सुनिल वाघ यांना आपले प्राण गमवावे लागले.
या सर्व मृत जवानांना शासकीय मानवंदना देऊन महसुल तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले व श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान मृत जवानांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांना दिलासा दिला.
तसेच पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचे मृतदेह तातडीने शोधण्यासाठी धरणातून सोडलेले पाणी बंंद करावे या मागणीसाठी युवकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनास पालकमंत्री ना विखे पाटील यांनी भेट देवून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
याप्रसंगी राज्याच्या पोलीस महासंचालक सौ. रश्मी शुक्ला, परीक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महासंचालक श्री. बी.जी. शेखर, जिल्हाधिकारी श्री. सिद्धराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.