बारामतीत लोकसभेचा फॉर्म कसा भरतो म्हणून एकावर जीवघेणा हल्ला..!
बारामती : तू लोकसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज कसा भरतो तेच बघतो असे म्हणत सहाजणांनी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्याचे उपाध्यक्ष रोहित बनकर यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला आहे. दरम्यान या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात बाबू पवार व त्याच्या अन्य पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रोहित बनकर हे त्यांच्या घरी असताना बाबू पवार याने
त्यांना फोन केला. तु कुठे आहे मला तुला भेटायचे आहे.असे त्याने फोनवर सांगितले. मी घरी जेवण करत आहे. असे उत्तर बनकर यांनी दिले. मी घरी भेटण्यासाठी येतो असे पवार म्हणाला. त्यामुळे जेवण उरकून बनकर हे खाली पार्किंगमध्ये येवून थांबले. बाबू पवार, रोहन व अन्य पाचजण दुचाकीवरून तेथे आले. बाबू पवार याने बनकर यांना तू लोकसभेचा अर्ज कसा भरतो तेच बघतो तु अर्ज दाखल केला तर तुला जीवानिशी खल्लास करेन, अशी धमकी देत बनकर यांना मारहाण केली. व दुचाकींवर पसार झाले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान हा सर्व प्रकार सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडला आहे.