बारामती ! निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण
बारामती - बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर नियुक्त केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष व इतर सहायक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम हाताळणी आणि निवडणूक प्रक्रियेविषयी प्रशिक्षण देण्यात आले.
माळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षणाला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणात श्री.नावडकर यांनी मतदानाची प्रक्रिया, ईव्हीएम यंत्र हाताळणी, ईव्हीएम यंत्रांची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, अभिरुप मतदान, ईडीसी मतदान प्रक्रिया, दिव्यांग मतदारांचे मतदान, मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचे अहवाल, निवडणुकी विषयक कागदपत्रे आदीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजाकरीता नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी चोखपणे पार पाडून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, अशा त्यांनी दिल्या.
दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रात एकूण २ हजार ६०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यापैकी आज पहिल्या दिवशी १ हजार ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राची जोडणी, हाताळणी, यंत्र चालू व बंद करणे तसेच सील करणे याबाबतचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार श्री. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.