दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी समन्वयाने कामे करा-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
बारामती : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक तेथे पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करणे, पशुधनासाठी चारा, चाऱ्याचे क्षेत्र वाढावे यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या भागात बियाणे उपलब्ध करून देणे आदी उपाययोजना राबविण्यात याव्यात; यासाठी सर्व संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करुन समन्वयाने कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या.
पंचायत समिती कार्यालय येथे आयोजित बारामती व इंदापूर तालुक्यातील पाणी व चारा टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी दिप्ती सूर्यवंशी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, श्वेता कुऱ्हाडे, जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे आदी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, टंचाई आराखडा महिनानिहाय सादर करा. त्याप्रमाणे कृती आराखडा तयार करुन कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत. नागरिकांसाठी पिण्याचे पाण्यासाठी मागणी असेल तेथे पाहणी करून पाणी पुरवठ्याची करावी. गावनिहाय पेरणी क्षेत्र, उपलब्ध चारा, चाऱ्याची लागवड त्यासाठी लागणारे बियाणे, पेरणीसाठी लागणारे पाणी याबाबत नियोजन करुन कृषी व पशुसंवर्धन विभाग तसेच स्थानिक यंत्रणेने योग्य ती कार्यवाही करावी.
पाण्याच्या टँकरची आवश्यकता असणाऱ्या गावांना तातडीने टँकर सुरु करण्याबाबत यापूर्वी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुढील १५ दिवसात अशा गावांची यादी तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी. खडकवासला तलावात सहा टीएमसी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. येत्या ८ एप्रिल रोजी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातून बारामती तालुक्यातील शिर्सूफळ तलाव तसेच इंदापूर तालुक्यातील भादलवाडी, मदनवाडी, शेटफळ गढे, तरंगवाडी तलाव, निरा डावा कालव्यातून वाघाळे तलाव, वरकुटे खुर्द, शेटफळ हवेली तलाव भरण्याबाबत नियोजन करण्यात यावे. स्थानिकांच्या मागणीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.
दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यावर प्राधान्य देत असून त्याप्रमाणे जिल्ह्यात धरणातून आर्वतने सोडण्यात येत आहे. टँकरची मागणी असलेल्या गावांची पाहणी करुन टँकर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे डॉ. दिवसे म्हणाले.
इंदापूर तालुक्याची माहिती तहसीलदार श्रीकांत पाटील आणि गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी दिली. तसेच गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी बारामती तालुक्यात सुरू असलेल्या टँकरची संख्या, जलजीवन मोहिमेअंतर्गत सुरु असलेल्या योजना, जनाई शिरसाई, पुरंदर नाझरे उपसा सिंचन योजना, मुर्टी प्रादेशिक योजना, चारा टंचाई, चारा डेपोबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
यावेळी बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे उपस्थित होते.