सुनेत्रा पवार यांना वाढता पाठिंबा; महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना जाहिर पाठींबा
इंदापूर, पुणे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षानं भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. केवळ पाठिंबा देवून न थांबता सुनेत्रावहिनींच्या ऐतिहासिक विजयाचे वाटेकरी होवू अशी ग्वाही या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख संजय सोनवणे, सोलापूरचे दिपक चंदनशिवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, रेहाना मुलाणी, साधना केकाण, सचिन सपकळ आदी मान्यवर उपस्थित होते.
अजितदादांच्या कामाची पद्धत सर्वज्ञात आहे. जात-पात, गट-तट न पाहता आलेली व्यक्ती आपलीच आहे असं समजून दादा जनतेची कामे करत असतात. त्यांच्या कामाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. त्यामुळेच आज सर्व घटकातून पाठिंबा मिळत असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. सर्वांनी एकजुटीने काम करुन घड्याळाचं चिन्ह तळागाळात पोहोचवण्याचं आवाहन करत तुम्ही दिलेल्या हाकेला आम्हा उभयंतांकडून तत्पर प्रतिसाद मिळेल असंही त्यांनी नमूद केलं.
आमदार दत्तात्रय भरणे यांनीही कार्यकर्त्यांना कधीही अंतर दिलं जाणार नाही अशी ग्वाही देत सुनेत्रा पवार यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं. अजितदादांनी नेहमीच सामान्य जनतेच्या प्रश्नांना महत्व दिलं आहे. कोणतंही काम असलं की वेळ न दवडता ते पूर्ण करण्यावर दादांचा भर असतो. आमच्या अडचणी सोडवण्यासाठी दादांसारख्याच नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं या पक्षाचे प्रमुख संजय सोनवणे यांनी यावेळी सांगितलं.