Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषदेत मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन....अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर मतदानाबाबत जनजागृती करावी-मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील

जिल्हा परिषदेत मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन
अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर मतदानाबाबत जनजागृती करावी-मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील

पुणे : पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर नागरिकांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, स्वीप समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, विजयसिंह नलावडे, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई आदी उपस्थित होते.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनातील अधिकारी आपली जबाबदारी चोख पार पाडीत आहेत, असे सांगून श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी तर मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. राज्यात मतदार संख्येच्यादृष्टीने पुणे हा मोठा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे.

जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली सतरा ते आठरा हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. प्रशासनात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची अधिक जबाबदारी असून इतरांना मतदानाचे आवाहन करताना त्याची सुरूवात आपण स्वत: मतदान करून करावी. गावातील ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करून गावातील जास्तीत जास्त नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करावे. ग्रामसेवकांनी गावातील दिव्यांग, वयोवृद्ध नागरिकांचे मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न करावे. 

श्रीमती तांबे म्हणाल्या, गेल्या सहा सात महिन्यापासून जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचेही यात खूप मोठे योगदान आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदार असलेल्या पुणे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी खूप कमी असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदानावेळी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून या तसेच अन्य सुविधांची माहिती देऊन मतदारांना मतदानाचे आवाहन करावे, असेही त्या म्हणाल्या. 

श्रीमती कडू म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून नव मतदारांची नोंदणी करून घेतली आहे. महिलांची टक्केवारी वाढावी यासाठी महिला व बाल कल्याण विभाग व बचत गटांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. शिक्षण विभागामार्फत शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याविषयी पत्रलेखनातून जनजागृती करण्यात येत आहे. सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा याबाबत पत्र देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test