मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी स्वीप कार्यक्रमांवर भर द्या- विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस. गंगवार
चुकीच्या माहितीचे खंडन करुन योग्य माहिती तात्काळ द्या- विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा
पुणे : राज्यात तसेच महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे विशेष प्रयत्न असून पुणे जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमांचा उत्कृष्टरित्या वापर करत यासाठी मतदार जनजागृती करा, असे निर्देश राज्यासाठीचे विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस गंगवार यांनी दिले. चुकीच्या माहितीचे खंडन करुन तात्काळ योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचेल अशी प्रभावी व्यवस्था राबवा, असे निर्देश विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा यांनी दिले.
भारत निवडणूक आयोगाकडून राज्याकरिता नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक श्री. गंगवार आणि विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक श्री. मिश्रा यांनी शासकीय विश्रामगृह येथे पुणे जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा पुणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, पुणे शहर सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील मतदार नोंदणीचा आढावा घेऊन श्री. गंगवार म्हणाले, मतदार नोंदणीत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. तथापि, १८ ते १९ वयोगट आणि १९ ते २९ वयोगटातील युवकांची लोकसंख्या पाहता अधिक मतदार नोंदणी व्हावी यासाठी आगामी ५ दिवस अभियान पातळीवर काम करा.
संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या घटत असल्याचे दिसून येत असून आवश्यक त्या मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांची सुरक्षा व्यवस्था तैनात करताना योग्य ते निकषांचे पालन करावे. कायदा व सुव्यवस्था सांभाळताना संयमाने कार्यवाही करावी. निवडणुकीत रोकड, मद्य आदींचे वाटप व वाहतुकीबाबत कठोर कारवाई करा, असेही श्री. गंगवार म्हणाले.
श्री. मिश्रा म्हणाले, पुणे जिल्ह्यात पोलीस विभागाकडून कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने चांगले काम होत आहे. निवडणूक ही संयुक्त जबाबदारी असून निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासन त्यासोबतच सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर संपर्कासाठी पोलीस विभागाने निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे. पोलीस आयुक्तालये आणि ग्रामीण पोलीस दलाने एकात्मिक नियंत्रण कक्षाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करावा.
निवडणुकीत पैशाचा वापर, दारू, मद्याची जप्ती त्याच बरोबर केवळ रोकड वाहतुकीवर लक्ष देणे पुरेसे नसून वस्तूस्वरुपात आणि युपीआय आदी माध्यमातून मतदारांना प्रलोभन देण्याचे व्यवहार होत आहेत का याकडेही लक्ष देणेही गरजेचे आहे.
माध्यमे, सोशल मीडियातून चुकीची माहिती, अफवा पसरवल्या जात आहेत का यावर लक्ष ठेवावे. अशा चुकीच्या माहितीची लागलीच दखल घेऊन त्याबाबची तथ्यता तपासणे, त्यावर कार्यवाही करणे, प्लॅटफॉर्मवर त्याबाबतचा प्रतिवाद तसेच बातमी देऊन नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविणे यावर विशेष लक्ष द्यावे, असेही यावेळी श्री. गंगवार आणि श्री. मिश्रा यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील तयारीची माहिती दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, श्री. चौबे आणि पोलीस अधीक्षक श्री. देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.