सोमेश्वरनगर येथे १०० खाटांचे आरोग्य पथक स्थापना करण्याबाबत शासन निर्णय
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती या संस्थेच्या अधिनस्त १०० खाटांचे आरोग्य पथक मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) येथे स्थापन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती परिसरातील नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमेश्वरनगर येथे १०० खाटांचे आरोग्य पथक स्थापन करण्यात येणार आहे. या आरोग्य पथकाकरीता उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या बांधकामाकरीता एकूण रू.७७ कोटी ७९ लाख इतक्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इमारतीमध्ये दिव्यांगाकरीता विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत, पदनिर्मिती, यंत्रसामुग्री व साधनसामुग्री इत्यादीबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे सोमेश्वरनगर परिसरातील नागरिक, ऊसतोड कामगार, संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याच्यावेळी येणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्यविषयक सोई-सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.