बारामती ! विद्या प्रतिष्ठान येथे मतदान जनजागृतीकरीता मतदान प्रतिज्ञा
बारामती : मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रमाअंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार बारामती गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान व मतदार जनजागृतीबाबत विद्या प्रतिष्ठान येथे मतदान प्रतिज्ञा आयोजित करण्यात आली.
यावेळी निवडणूक स्वीपच्या प्रमुख तथा समाज कल्याण गृहपाल सविता खारतोडे, विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राचार्य भारत शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रमुख मंगल माळशिकारे आदी उपस्थित होते.
यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांचे घोषणाफलक व भित्तीपत्रिक हातात घेवून मतदान जनजागृती केली.