'अमृत' संस्थेच्या लघुउद्योग प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा.
पुणे - महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या लघुउद्योग प्रशिक्षण योजनेला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून पहिल्या टप्यात १ हजार ७२५ लघुउद्योजकांची नोंदणी झाली आहे. आगामी काळात सुमारे ८ हजार लघुउद्योजक निर्माण करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट असून पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे.
खुल्या प्रवर्गातील कुठल्याही शासकीय विभाग, योजना, महामंडळे, उपक्रम यांच्याकडून लाभ मिळत नसलेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्य शासनाने ‘अमृत’ या स्वायत्त संस्थेची स्थापना केलेली आहे. लघुउद्योजक प्रशिक्षण योजनेंतर्गत पहिल्या टप्यातील १ हजार ७२५ लघुउद्योजकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातील कृषीआधारित लघुउद्योगांचे १९० लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान आंतरवासिता (इंटर्नशीप), व्यवसाय सुरू करण्यासाठी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन, लाभार्थ्यांना बँकिंग व वित्तीय संस्थांमार्फत व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी सहाय्य व मार्गदर्शन, व्यवसाय प्रसिद्धीसाठी डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल, उद्यम नोंदणी आणि प्रकल्प भेटीद्वारे सहाय्य आदीबाबत माहिती देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित उमेदवार हा खुल्या प्रवर्गातील असल्याचा पुरावा असावा. उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा. पात्र उमेदवारांने 'अमृत'च्या www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तसेच ऑफलाईन करता येणार आहे. अर्जासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, रहिवासी दाखला, जागेबाबतचा पुरावा तसेच कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडावे. अधिक माहितीसाठी 'अमृत'च्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त 'ध्रुव अकॅडमी'च्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन अमृतच्या निबंधक डॉ.प्रिया देशपांडे यांनी केले आहे.