उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना ई-स्कुटरचे वाटप
बारामती - पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् व ओमा फाऊंडेशन यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे देण्यात आलेल्या १० ई-स्कुटरचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडीला ६, होळ-६, काटेवाडी-३, लोणी भापकर-३, माळेगाव बु-४, मोरगाव-७,मुर्टी -२, पणदरे-३, सांगवी-४, शिर्सुफळ-५, बारामती नगर परिषद-७ असे एकूण ५० ई-स्कुटर वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित ४० ई-स्कुटरचे दुसऱ्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे.
या स्कुटरचा उपयोग दैनंदिन आरोग्य सर्वेक्षण, गरोदर मातेच्या प्रसुतीकाळात त्यांच्यासोबत आरोग्य केंद्रात जाण्याकरीता तसेच इतर आवश्यक त्या आरोग्य सेवेसाठी आशा स्वयंसेविकांना होणार आहे. यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.