सोमेश्वरनगर ! सभासदांचा संपुर्ण ऊस गाळप करण्यास सोमेश्वर कारखाना कटिबद्ध - पुरुषोत्तम जगताप
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आजअखेर १०६ दिवसांमध्ये कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ७५०० मे. टन एवढी असताना सरासरी प्रतिदिन ९००० मे. टनाने गाळप करीत एकूण ९,४७,०८४ मे.टन ऊसाचे गाळप केले असून यामधून जिल्ह्यामध्ये सर्वोच्च सरासरी ११.६२ टक्के साखर उतारा राखत १०,९६,००० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याकडे मुबलक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध असून, ऊस तोडणी वाहतूकीचे योग्य व चांगल्या प्रकारचे नियोजन केल्यामुळे संपुर्ण पुणे जिल्ह्यात कारखान्याने क्रमांक एकचा साखर उतारा राखत आजअखेरचे गाळप पुर्ण केले असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हंटले आहे की, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद यांच्या जानेवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास प्रति मे. टन रु.७५/-, फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास प्रति मे.टन रु.१००/- तर मार्च नंतर हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या ऊसास प्रति मे.टन रु.१५०/- असे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय संचालक
मंडळाने घेतलेला असून, त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना जानेवारीमध्ये रु.३,०७५/-, फेब्रुवारीमध्ये रु.३,१००/- तर मार्चपासून तुटणाऱ्या ऊसास रु.३,१५०/- प्रति टन अशी एकरकमी उचल मिळणार आहे. तसेच श्री. जगताप पुढे म्हणाले की, पुढील हंगामात तुटणाऱ्या खोडवा ऊसासाठी कारखान्याने प्रति मे.टन रु. १५०/- अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला असून चालू लागण हंगामातील सुरु ऊसाच्या लागवडीसाठी प्रति मे. टन रु.१५०/- अनुदान देणेचा निर्णय घेणेत आलेला आहे.
अध्यक्ष जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याकडे नोंद केलेल्या सभासदांचे व बिगर सभासदांच्या संपुर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना कटीबद्ध असून गाळप पुर्ण करत असताना जिराईत भागातील पुर्व हंगामी ऊस तोडीस प्राधान्य देत असताना कार्यक्षेत्रातील संपुर्ण आडसाली हंगामातील ऊस माहे फेब्रुवारी अखेर संपविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे तसेच कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुचनेनुसार पुरंदर उपसा सिंचन योजनेची दुरुस्ती करण्यासाठी कारखान्याचा इलेक्ट्रीकल व मॅकॅनिकल स्टाफची मदत गेली २० दिवस दिली
असल्यामुळे येत्या दोनच दिवसात पुरंदर उपसा सिंचन योजना अजित पवारसो यांच्या सहकार्यामुळे चालू होण्यास मदत झालेली आहे. तरी कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस सोमेश्वर कारखान्यासच गाळपास देवून सहकार्य करावे अशी विनंती आहे.