Type Here to Get Search Results !

बारामती ! पुरूषांच्या बरोबरीने महिलांचे गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे- रमेश चव्हाण

बारामती ! पुरूषांच्या बरोबरीने महिलांचे गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे- रमेश चव्हाण
बारामती : राज्यात हजार पुरूषांच्या तुलनेत महिलांचे ९२५ इतके कमी गुणोत्तर प्रमाण आहे. पुरूषांच्या बरोबरीने महिलांचे गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले. 

जिल्हा परिषदेचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व बाल कल्याण विभाग व बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुका महिला स्वयंसहाय्यता गट कौशल्य विकास व क्षमता बांधणीसाठी कविवर्य मोरोपंत नाट्यमंदिर बारामती येथे आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी बारामती हाय टेक टेक्सटाईलच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या  प्रकल्प संचालक शालिनी कडु, पंचायत समिती बारामतीचे गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने,  बँक ऑफ महाराष्ट्राचे श्रीकांत कारेगावकर आदी उपस्थित होते. 

श्री. चव्हाण म्हणाले, 'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते प्रत्येक शिक्षणाच्या टप्प्यापर्यंत १ लाख रूपयांचे अर्थसहाय्य शासनातर्फे देण्यात येते. महिला स्वयंसहायता गटाला सक्षम करण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना कार्यान्वीत आहेत. महिला स्वयंसहायता गटांनी  योजनांचा लाभ घेऊन सक्षम बनावे. 

काही महिला स्वयंसहाय्यता गटांनी चांगले कौशल्य आत्मसात केले आहे. त्यांच्या कौशल्यातून त्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळत असून आर्थिक उन्नती होत आहे. बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्कने वेगवेगळे ब्रँड निर्माण केले आहेत. त्याच्या माध्यमातूनही  महिलांना रोजगार मिळून उद्योजकतेत वाढ होत आहे, असेही ते म्हणाले. 

श्रीमती पवार म्हणाल्या, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई, क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संस्कारातून आजचा महाराष्ट्र घडला आहे. कर्तृत्ववान स्त्री शक्तीची परंपरा  महाराष्ट्रात आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि कर्वे यांनी  महिला सक्षमीकरणाची बीजे रोवली. हा पुरोगामी वारसा पुढे नेण्याचे कार्य आपणाला करायचे आहे. 

देशाच्या प्रगतीत महिलांचा सहभाग मोठा आहे. महाराष्ट्र शासन महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवित आहे. शासकीय नोकरीत आरक्षण, बसच्या भांड्यात ५० टक्के सवलत, मुलाच्या नावानंतर आईचे नाव लावणे इत्यादी महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतले आहेत.  प्रत्येक निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. बारामती टेक्सटाईल पार्क महिलांना रोजगार देवून आर्थिक सक्षम करण्याचे कार्य करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

श्रीमती कडु म्हणाल्या, महिला स्वयंसहाय्यता गटांना बँकेकडून विविध व्यवसायासाठी कर्ज कर्जाचे वाटप केले जाते. त्यामुळे महिलांची उन्नती होत असते. स्वयंसहाय्यता गटाकडून बँकेचे कर्ज  वेळेवर परतफेड होत असल्यामुळे  त्यांना परत कर्ज घेण्यास अडचण निर्माण होत नाही. महिला आर्थिक सक्षम झाल्यास कुटुंब, गाव, जिल्हा, देश सक्षम होण्यास वेळ लागत नाही. स्वयंसहायता गटातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

प्रास्ताविकात श्री. बागल म्हणाले, बारामती तालुक्यात २ हजार महिला स्वयंसहायता गट कार्यरत आहेत. बारामती हाय टेक टेक्सटाईल पार्कमध्ये ३ ते साडे तीन  हजार महिला रोजगार करीत असून महिलांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होत आहे. टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून महिला बचत गटालाही सहकार्य केले जाते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत स्वयंसहायता गटाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अंगणवाडी सेवीका, मदतनीस यांच्या माध्यमातून विविध योजनांची जनजागृती केली जाते, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test