'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे म्हणत, मकर संक्रांतीचा सण का साजरा केला जातो
मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. या वर्षी १५ जानेवारीला म्हणजे सोमवारी हा मकर संक्रांतीचा सण आहे.
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो