बारामती ! निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कृती आराखडा तयार करा-वैभव नावडकर
बारामती - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे, निर्भय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी गावनिहाय कृती आराखडा तयार करा, असे निर्देश उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिले.
उप विभागीय अधिकारी कार्यालय येथे बारामती व इंदापूर तालुक्यातील महसूल व पोलीस प्रशासनासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, निवासी तहसीलदार विलास करे, नायब तहसीलदार प्रतिभा शिंदे, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आदी उपस्थित होते.
श्री. नावडकर म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्यादरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाहीत, यादृष्टीने पोलीस प्रशासनाने सतर्क राहून कामे करावीत. निवडणुकीच्या काळात गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी मतदार संघांमधील गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि गटांची गावनिहाय अद्ययावत यादी तयार करावी. या यादीमध्ये मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुक, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या वेळी घडलेले गुन्हे, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल घडलेले गुन्हे, स्थानिक गुन्हे, जबरी चोरी, खून, दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे, अवैध शस्त्रे बाळगणे, दारुबंदीची प्रकरणे आदी गुन्ह्याचा समावेश होईल याबाबत दक्षता घ्यावी.
सेक्टर अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा. मागील निवडणुकीत एकाच उमेदवाराला अधिकचे मतदान झालेल्या मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्याबाबात आढावा घ्यावा. निवडणुकीच्या दरम्यान एखाद्या व्यक्ती किंवा गटांवर दबाव टाकून, प्रलोभन दाखवून एखाद्या विशिष्ट उमेदवारालाच मतदान करण्यास परावृत्त करणे किंवा मतदानापासून वंचित ठेवणाच्या प्रयत्न केला जातो. अशा व्यक्ती किंवा गटांवर लक्ष ठेवावे. मतदारसंघातील संशयित व्यक्तीची नोंद घ्यावी, अशा सूचना श्री. नावडकर यांनी दिल्या