शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा : शिवतारे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी हा स्तुत्य उपक्रम ठिकठिकाणी राबविण्यात येत आहे.अशा उपक्रमातून सर्व सामान्य जनतेने शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे उपनेते तथा महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी केले.
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील शिवसेना संपर्क कार्यालयासमोर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने असंघटीत बांधकाम कामगारांसाठी सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे तसेच भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या हस्ते करण्यात आले.
या दरम्यान आयोजित कार्यक्रमात शिवतारे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले यापूर्वी राज्यातील असंघटीत कामगारांसह निराधार व्यक्ती तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शासन दरबारी हेलपाटे मारावे लागत होते.मात्र शासन आपल्या दारी या उपक्रमाव्दारे सर्वसामान्य जनतेसह शालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.
या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप यादव, महिला आघाडीच्या शालिनी पवार ,युवा सेनेचे उपतालुका प्रमुख सागर भुजबळ, बारामती तालुका अध्यक्ष स्वप्नील जगताप,गट प्रमुख राहुल यादव, गण प्रमुख प्रदीप चव्हाण, विराज निगडे ,उदय निगडे, राजेंद्र शेळके ,अथर्व पवार ,लालासाहेब दगडे, वागदरवाडीच्या माजी सरपंच उषा पवार ,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार ,रोहित भोसले ,सुधाकर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.