पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अनधिकृत अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन
पुणे : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील अनधिकृत अतिक्रमणे व विना परवाना बांधकाम सात दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये कि.मी. ८ ते कि.मी. २५२.३५० दरम्यान लगतच्या मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ च्या विस्तारीकरणास अडथळा होत आहे.
त्यामुळे या लांबीदरम्यान केलेली अनधिकृत अतिक्रमणे, बांधकामे स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे प्राधिकरणाच्यावतीने यांच्यावतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम २००२ अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल, असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी कळविले आहे.