कृषी पणन मंडळाच्यावतीने १७ जानेवारीपासून ‘मिलेट महोत्सवा’चे आयोजन
पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने आयोजित 'मिलेट (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-२०२४' चे उद्घाटन १७ जानेवारी रोजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट येथे १७ ते २१ जानेवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पणन मंडळामार्फत दरवर्षी 'उत्पादक ते ग्राहक थेट विक्री' या संकल्पनेअंतर्गत विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा यामागील उद्देश आहे.
या महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, तृणधान्य प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या सहभागी होणार आहेत. या उत्पादकांना सुमारे ५० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
येथे ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा ही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात येणारा ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स आदी नाविण्यपूर्ण उत्पादने थेट उत्पादकांकडून प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
याबरोबरच महोत्सवात मिलेट उत्पादने, मूल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्त्व याविषयी नामांकित तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, खरेदीदार-विक्रेते संमेलन आदी कार्यक्रम असणार आहेत. पुण्यातील ग्राहकांनी मिलेट खरेदीसह विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले.