प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना वीजबिलात माफी द्यावी- काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात
नागपूर हिवाळी अधिवेशनात वेधले शासनाचे लक्ष
नागपूर : ग्रामीण भागात नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा योजना थकीत वीजबिल आकारणी अभावी बंद झालेल्या आहेत, या योजनांना शासनाने वीजबिलात माफी किंवा सवलत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केली.
नागपूर हिवाळी अधिवेशनात बाळासाहेब थोरात यांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा मुद्दा लावून धरला.
थोरात म्हणाले, ‘राज्यात बहुतांश भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. अशावेळी थेट पाण्याचा उद्भव नसलेल्या भागात शासनाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चांगले काम करतात. मात्र या योजना राबवताना मोठे वीजबिल त्यासाठी आकारले जाते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हे वीजबिल भरणे लाभार्थ्यांना परवडत नाही. आज महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांत ग्रामीण भागात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाची अवस्था वीज देयकच्या बाबतीत अत्यंत कठीण झालेली आहे. त्यांची विज कट केली जात आहे, अशा परिस्थितीत या गावांमध्ये आठ-आठ दिवस पाणीपुरवठाच होत नाही. यामध्ये शासनाने गंभीरपणे विचार करावा व त्याबाबत धोरण निश्चित करून त्या गावच्या पाठिशी उभे राहावे.‘
थोरात पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. योजना सुरू झालेल्या आहे. आता विजबिला अभावी योजना ठप्प आहेत, नागरिकांना पाणी मिळत नाही, शासनाला जबाबदारी घ्यावी लागेल. या अगोदरही शासनाने निर्णय घेतलेला आहे. आता उशीर करू नये. धोरण ठरवावे आणि सामान्य माणसाला दिलासा द्यावा.‘